लातूर /प्रतिनिधी-सोमनाथ काजळे
औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार श्री. विक्रम काळे यांनी औसा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना शंभर टक्के लसीकरण करण्याचे आवाहन मराठवाड्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना केले. या दौऱ्यात त्यांनी औसा तालुक्यातील आदर्श विद्यालय, औसा, श्रीमती, लक्ष्मीबाई ढेंकरे विद्यालय फत्तेपूर, नवभारत माध्य.व उच्च माध्य. विद्यालय खरोसा, जि.प. प्रशाला जावळी, जि.प. प्रशाला लामजना, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किल्लारी, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, किल्लारी, जि.प. प्रशाला नागरसोगा, अजिम विद्यालय औसा, श्री. मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय औसा. आदी शाळांना भेटी देऊन तेथील कोविड लसीकरणाचा आढावा घेतला व कोविड चे सर्व नियम पाळून १० वी व १२ चे वर्ग व्यवस्थित सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
आमदार विक्रम काळे म्हणाले की, सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे संबंधित विद्यार्थी आपलेच असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपलीच जबाबदारी आहे.
दिवसभर विविध शाळांना शाळाभेटी देऊन दुपारी ठीक चार वाजता श्री. मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात औसा तालुका शिक्षक दरबार घेण्यात आला. यावेळी मंचावर औसा तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती, अनुपमा भंडारी, लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. राम कापसे, मुख्याध्यापक श्री. जलसकरे सर, केंद्रप्रमुख श्री. कमलाकर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले की, या अगोदर प्रत्येक जिल्ह्याला शिक्षक दरबार घेऊन मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर आदी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जात होत्या पण यापुढे माझ्या मतदार संघातील ७८ तालुक्यात तालुकास्तरीय शिक्षक दरबार घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविणार आहे.
यावेळी बोलताना आ.विक्रम काळे म्हणाले प्रचलित अनुदान धोरण लावण्यासाठी सभागृहात मी मागणी लावून धरल्याचे सांगितले. लवकरच यावर शासन स्तरावर बैठक होणार असून प्रचलित अनुदान धोरण लागू करवून घेऊ असे आश्वासन दिले. अपात्र शाळांचा विषय लांबला असला तरी तो लवकरच मार्गी लावला जाईल. अघोषित शाळांचे प्रस्ताव तातडीने मंत्रालयात पाठविण्याबाबत पुणे येथे नुकतीच संचालक यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे.
जुनी पेन्शन योजना हा शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सम्यक समितीचा अहवाल आल्यानंतर हा निर्णय लवकरच करवून घेतला जाईल. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग-२ च्या पदाबाबत शासन स्तरावर सकारात्मक पाठपुरावा सुरू आहे. असेही काळे यावेळी म्हणाले.
शिक्षक दरबार यशस्वितेसाठी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री. सूर्यकांत साळुंके, उपाध्यक्ष श्री. सोमनाथ काजळे, विजयकुमार यादव, निलेश माने, सुनिल सुर्यवंशी, श्याम भोसले, बाबासाहेब भिसे, शिवराम शिंदे, गणपत जाधव आदींनी परिश्रम घेतले.