पारोळा;- भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिरसोलीच्या दांपत्याचा पुढील चाकात येऊन चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी पारोळा -एरंडोल महामार्गावरील सार्वे फाट्यानजीक घडली . दोन्ही दाम्पत्यांच्या पोटावर चाक आल्याचे चित्र अनेकांना गहिवरायला लावणारे होते . अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने पोबारा केला .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , शिरसोली ता. जळगाव येथील येथील मधुकर महारु पाटील वय ४५ व त्यांच्या पत्नी प्रतिभा मधुकर पाटील वय ४० हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे त्यांच्या मावशीला भेटण्यासाठी दुचाकीवर जात होते. मात्र भरधाव येणारा ट्रक क्रमांक ओडी -१५ -एफ २७५१ ने दुचाकीला धडक देत मधुकर पाटील आणि प्रतिभा पाटील हे दोन्ही पती पत्नी ट्रकच्या डाव्या बाजूच्या चाकात आल्याने दोघांच्या पोटावर चाक उभे राहिल्याने दोन्ही जागीच गतप्राण झाले. या घटनेमुळे शिरसोली गावात शोककळा पसरली आहे . याबाबत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते .
अपघात हा महामार्गावरील खड्ड्यांमुळे झाल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती कळताच पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे , काशिनाथ पाटील, पंकज राठोड, विनोद माली, सुनील साळुंखे, आदींनी पाहणी करून दोघांचे मृतदेह जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

पवन पाटील