औसा- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उजनी येथील घटना.
औसा /प्रतिनिधी -ज्ञानेश्वर सूर्यवंशी
औसा-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडवर बुधवारी (ता.२७) पुन्हा एकदा बस आणि दुचाकीचा अपघात झाला असून यामध्ये बसने दुचाकीला पाठीमागून धडक देत एकाला चिरडले आहे. तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. दोन दिवसांपूर्वी येथील बस व दुचाकीच्या अपघातात पिता व पुत्राचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आणखी एक अपघात झाल्याने ग्रामर येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अधिक माहिती अशी की, शेषेराव वैद्य (वय ३५) असे अपघातात मृत्यु पावलेल्या युवकाचे नाव आहे. ते आपले वडील आप्पाराव वैद्य यांच्या सोबत पंढरपूरहून एमएच १३ एजी १०९१ या आपल्या दुचाकीहून दिवाळी सणासाठी चिंचोली काजळे (ता.औसा) या आपल्या गावी परतत होते. उजनी (ता. औसा) येथील मोडवर त्यांच्या दुचाकीला कवठेमहांकाळ- नांदेड या बसने (क्रमांक एम एच १४ टी ४६३५) पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये वडील अप्पाराव वैद्य हे जखमी झाले आणि त्यांचा मुलगा शेषेराव हा बसच्या पाठीमागील चाकाखाली चिरडला गेल्याने जागीच मरण पावला.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
