देऊळगाव/प्रतिनिधी-किरण जटाळे
देऊळगाव गुजरी येथे दुपारी २ वाजेच्या सुमारास एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की देऊळगाव गुजरी येथील कापुसवाडी रोड परिसरात सुरेश रघुनाथ आवटे हे आपल्या आई वडील व पत्नी सोबत राहत असत. सुरेश याचे लग्न एप्रिल महिन्यात गोदरी येथील पुरुषोत्तम पाटील यांची कन्या मनिषा हिच्याशी झाले. सुरेश व मनीषा यांचा संसार अगदी सुखाने चालला होता. त्यातच मनीषा पाच महिन्याची गरोदर असल्याने घरात अगदी आनंदी वातावरण होते. सुरेशलाही राज्य परिवहन मंडळ बुलढाणा आगार येथे नुकतीच नोकरी लागलेली आहे. आज सकाळी सुरेश चे आई वडील शेतात निघून गेले व सुरेश ही आपल्या ड्युटीवर निघून गेला. त्यानंतर मनीषा एकटीच आपले घरात होती. दुपारच्या सुमारास मनीषाने घरातीलच एका खोलीत असलेल्या पंख्याला दोरीचा गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दुपारी सासू-सासरे शेतातून परतल्यावर त्यांना सर्व प्रकार दिसताच त्यांचे तोंडचे पाणी पळाले. आक्रोश आणि क्रंदनाने वार्ता गावभर पसरली. पोलीस पाटील यांचे खबरी वरून फत्तेपुर दूरक्षेत्र पोलिसांना याबाबत माहिती देताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरुवात केली. यावेळी मयत सौ मनीषा आवटे हिने मृत्यूसमयी लिहिलेले पत्र व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. घटनास्थळी जामनेर पो.स्टे.चे पी. आय. किरण शिंदे सध्या चार्ज पहुर पो.स्टे. दाखल झाले होते. त्यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. संजय बनसोडे, सहा. फौ. अनिल सुरवाडे, पो.काॅ. प्रवीण चौधरी इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. गुण्यागोविंदाने चालत असलेल्या संसारात अचानक विवाहितेने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
