कोल्हापूर प्रतिनिधी:- प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी.
नमस्कार करून सोशल डिस्टन्स संभाळणे हे भारतीय मूल्य संस्कारच आहे. सी. वा. उमर्जीकर यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये
चारित्र्य हे जीवनाचे प्रमुख अंग आहे. आपल्या स्वभाव वैशिष्ठ्याचा तो महत्वाचा घटक आहे.एवढेच नव्हे तर उत्तम चारित्र्य हा भारतीय संस्कृतिचा आत्मा आहे.चारित्र्य संपन्नता ही समाजात मान्यता पावलेली सर्वश्रेष्ठ संपन्नता आहे.व्यक्तिंमधील सद्गुण,व्यावहारिक सत्शीलत्व, प्रामाणिक आचरण ,मानवतेची कणव,सत्याची आवड, कर्तव्यनिष्ठा,निर्मळ जीवन जगण्याकडे मानसिक कल या सर्वांचा आचार, विचार व कृतीतून जाणवणारा एकत्रित प्रभाव म्हणजे चारित्र्य! माणसाची खरी ओळख ही त्याचे चारित्र्य असते.बुद्धी व भावनेच्यासहाय्याने ते नवनिर्मितीचे आवाहन करते.
चारित्र्यवान व्यक्ती प्रगतीपथावर राहून अंतिम यश प्राप्त करतात कारण त्यांचे जगणे सद्हेतूने प्रेरीत असते.जिथे जगण्यात हेतू आहे तिथे ध्येयसिद्धीसाठी सेतू आहे.अशा प्रेरणा उराशी बाळगून जगतांना वेगळे काही करणारे हात लागतात,नाविन्य पाहाणारे डोळे लागतात, आकाशवाणी ऐकणारे कान लागतात कल्याणकारी सत्य सांगणारी वाचा लागते,समाजाचे रूण फेडणारा श्वासोश्छ्वास लागतो आणि शाश्वत तत्वांचा विचार करणारा मेंदू लागतो.उत्तम चारित्र्यातून प्राप्त होते चैतन्याचा स्वीकार करण्याची क्षमता,सर्वस्व अर्पून त्याग करण्याचे धैर्य आणि विवेकाला त्याज्य वाटणार्या गोष्टी नाकारण्याचे साहस! चारित्र्यसंपन्नतेबरोबर नांदणारी प्रतिभा रोज उगवणार्या त्याच सूर्यात नवा दिवस पाहाणारी असते व नित्य एक वेगळा विचार, एक वेगळी कृति,एक वेगळा शोध घेऊन क्षणाक्षणाला नवे पंख देऊन जाणारी असते!
चारित्र्य संवर्धन खरं म्हणजे शिक्षणाचा एक प्रमुख उद्देश्य आणि अटळ जबाबदारी सुद्धा!शिक्षणाने समाजाशी केलेली ती वचनबद्धता (Commitment) आहे.चारित्र्याची जडणघडण आयुष्यात आपण अंगिकारलेल्या मूल्यांवर अवलंबून असते. अशा मूल्यांची व्यावहारीक किंमत आपण ठरवू शकत नाही.व्यक्तीच्या,समाजाच्या,राष्ट्राच्या उत्थानासाठी अस्पष्ट होऊन अदृष्य होत चाललेल्या मूल्यांची पुनर्स्थापना होणे आवश्यक झाले आहे.अशी तीन मूलभूत मूल्ये आहेत….. मानवी मूल्यें..जीवन मूल्यें व नीतीमूल्यें.
१)दया,क्षमा,शांती,श्रद्धा,प्रेम व भक्ती या मूलभूत संवेदना घेऊन स्फटिकासारख्या अंतःकरणाने जीव जन्माला येतो. या संवेदना न हरवता आयुष्यभर त्या जतन करून,त्यांचे संवर्धन करून कल्याणकारी उपयोग करून या मानवी मूल्यांचे स्थान दृढ केले पाहिजे.
२) इतरांना त्रास न देता झालीच तर मदत करत दुसर्यांसाठी जगतांना आपण उपकार करतोय ही भावना विसरून सुसंगतपणे जगणे तसे अवघड असते. कुसुमाग्रज म्हणतात
हजार डोळ्यांमधले पाणी माझ्या डोळ्यांमध्ये जमते । हजार हृदये गहिवरली तर मन माझे गहिवर । असे हजारांसंगे आहे जडले माझे नाते।।
यालाच जीवनमूल्ये म्हणतात.
३)जगण्यातल्या मर्यादा,वागण्यातल्या मर्यादा,वृत्तीच्या मर्यादा व स्वाभिमानाच्या मर्यादा पाळून समाजाला पोषक अशा नीतीतत्वांचे व नीतीशास्राचे बंधन पाळून स्वतःची नैतिकता जोपासून आदर्शत्वाने तिचे पालन करणे हे नीतिमूल्यात अभिप्रेत आहे.
चारित्र्य मूल्ये यावर अधिष्ठित समाजच विश्वात आदर्श ठरू शकेल! कोरोना च्या प्रादुर्भावामुळे हीच नैतिक मूल्ये किती मानवाला महत्वाची आहेत हेच सर्व जगाला कळून चुकले आहे!
