प्रा. डॉ. स्मिता सुरेश गिरी,
गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर.

शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलाम गिरीच्या खाईत लोटल्या
गेलेल्या लाखो दलित – पीडितांचे पुनरुत्थान करणारे महामानव म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार , कार्य मात्र त्याला अपवाद आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण
व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणाम कारक व स्फूर्तिदायी ठरते.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ मध्ये महू (मध्यप्रदेश) येथे झाला. तत्कालीन प्रखर अशा सामाजिक विषमतेमुळे बालपणीच त्यांच्या मनावर वाईट अनुभव कोरले गेले.
पुढे १९१३ ला ते जेव्हा बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी
दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेला गेले, तेव्हा त्यांना अस्पृश्यतेचा काहीच त्रास झाला नाही. या परस्परविरोधी अनुभवांचा
विचार करून त्यांनी आपल्या देशाला व समाजबांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायचे मनोमन ठरवले. परदेशात
असतांनाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता,
‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया – ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी’. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात
‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी.ही पदवी मिळवली.
भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी, त्यांनी ‘मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०) आणि ‘प्रबुध्द भारत’ (१९५६) अशी वृत्तपत्रे चालवली. या काळात
जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्रांचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही. स्पृश्य आणि
तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्टय होय. केवळ
वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी ‘दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’,
‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय
‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ हा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला. साहित्याला त्यांनी मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच वापरले नाही. उत्तम समाजसमीक्षक असण्या बरोबरच स्वत: एक वाङ् मय-समीक्षक असणार्‍या डॉ. आंबेडकरांनी संत तुकाराम,
संत ज्ञानेश्र्वर, मुक्तेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘खरा ब्राम्हण’, यशवंत टिपणीस यांच्या ‘दख्खनचा दिवा’ या नाटकांवरदेखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेले आहेत. बटर्‌रान्ड रसेल यांच्या
‘प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ या नाटकावर त्यांनी आपले मत नोंदवले आहे. ‘रिडल्स इन हिंदुइझम’,
‘महाराष्ट्र अॅ ज अ लिंग्विस्टिक स्टेट’, ‘स्टेट्स अँड मायनॉरिटिज’,
‘भारतातील जाती’ या ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली.
डॉ. आंबेडकर यांच्यावर संत कबीर, महात्मा जोतिराव फुले व राजर्षी शाहू महाराज या व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा प्रभाव होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन सत्याशी भिडणारा शाश्वत स्वरूपाचा आहे!.
संपूर्ण समाज सुसंस्कृत आणि समान बनवायचा असेल तर कौशल्यपूर्वक ज्ञानाचा पुरस्कार, कालानुरूप परिवर्तन व प्रचार करणे गरजेचे आहे.
डॉ. आंबेडकरांचा शिक्षणातील निसर्गसंवाद म्हणजे केवळ निसर्गावर अवलंबून राहणे नव्हे तर निसर्गातील आपण एक भाग/ घटक आहोत, यामुळे सर्व निसर्गातील नियमांचे पालन करत इतरांवर अवलंबत्व आले, इच्छा आल्या, आकांक्षा आल्या मग त्या पूर्ण करण्यासाठी स्वत: प्रयत्न करावे लागतात आणि हेच निसर्गवादातील सत्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपूर्वी काही पाश्‍चात्य व भारतीय अभ्यासकांनी शिक्षणाचे मानवी जीवनातील स्थान, महत्त्व, ध्येय आणि उपयोगिता सिद्धांताच्या माध्यमातून मांडण्यात आले हे वेळीच सांगितले आहे. त्यांनी प्रचलित शिक्षणविषयक सिद्धांताचा प्रत्यक्ष जीवनाशी सहसंबंध जोडला, काही बदल सुचविले, नवा शैक्षणिक सिद्धांत मांडला. संपूर्ण मानवजातीला शिक्षणाची गरज, महत्त्व व उपयुक्तता पटवून दिली व समाज परिवर्तनाचे दालन खुले करून दिले.
शिक्षणप्रेमी बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक ध्येयधोरणांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असणे हा भारतीय शिक्षणव्यवस्थेचा ध्यास असायला हवा. शिक्षणाचा अधिकार 2009 हा कायदा 2010 पासून लागू झाला आहे. सक्तीच्या शिक्षणाच्या या कायद्यात बाबासाहेबांच्या विचारांचेच प्रतिबिंब आहे. अर्थात असा कायदा असला तरी आजही अनेक मुले शाळाबाह्य आहेत.
शिक्षणाचे ध्येय काय?
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पितो तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत, असे बाबासाहेब सांगत असत.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. सर्वांगीण शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होतो. आत्मविश्वास वाढतो, व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील, प्रेम आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केली. शाळेत मुलांची मने सुसंस्कृत, सदृढ व गुणवत्तामय बनवावीत. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधीलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत, असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत, याचे भान या समाजबद्ल प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनि ठेवावे.
‘राज्यघटनेचे शिल्पकार,’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती! १४ एप्रिल 2020
या डॉ. स्मिता गिरी यांच्या लेखात त्या लिहितात-
आजही lockdown च्या काळात सतत आठवण येते ती संविधानाची आणि ते तितक्याच निरपेक्षतेने लिहीणार्या मितभाषी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची. पुनः भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. आजुबाजूची परिस्थिती पाहिली तर असे वाटते, की भारतीय लोकशाहीला भारतीय जनताच तर कारणीभूत नाही ना? स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी
चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, ‘जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची
जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो.
सरकार बद्दलतीलही पण आपण स्वतंत्र झाल्यामुळे व स्वतंत्र असताना चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला प्राप्त परिस्थिती मध्ये अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.’
आज ही त्यांचे महान विचार तितकेच योग्य आहेत!.
अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वत: घेतलेले अति उच्च दर्जाचे शिक्षण;
जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती,
संघटन कौशल्य; शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा; वक्तृत्व; इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व; प्रचंड वाचन; संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन, हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, याना त्रिवार वंदन!’

डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी या आपल्या कवितेत योग्य वर्णन करतात ते या पद्धतीने…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – एक परिवर्तन!
प्रज्ञा सूर्य म्हणू,
की क्रांती सुर्य…
सर्व शब्दांत आहे,
तुझा अंतरंग…
बाबासाहेब आंबेडकर,
हे एक नाव नाही…
हे तर सर्वत्र,
व्यापून राहिलेलं पर्व!

मानामनातून भरले,
प्रेमाचे सप्तरंग…
रंध्रारंध्रातून पेरले,
क्रांतीचे तरंग…
बाबासाहेब आंबेडकर,
हे एक नाव नाही..
हे तर स्वातंत्र्य,
व्यापून राहिलेलं तंत्र!

दलितांसाठी, धम्मचक्र
परिवर्तन…
पीडितांसाठी,
संविधान आधीपाठण…
बाबासाहेब आंबेडकर,
हे एक नाव नाही…
हे तर नवयोग आवर्तन,
व्यापून राहिलेलं…
महामानव परिवर्तन!
महा परिवर्तन,
समाज परिवर्तन!