डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.. काळाच्या, संस्कृतीच्या, धर्माच्या ही मर्यादा न सांभाळता प्रचंड पराक्रम करून जातीयता पूर्णपणे नष्ट करण्याचे आणि समता स्थापन करण्याचे असीम कार्य मानव जातीच्या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. ज्यांच्याकडे कर्णाचा मोठा पराक्रम होता आणि ज्ञानेश्वरांचे महाज्ञान होते. त्यामुळे कर्ण आणि ज्ञानेश्वर यांचा समन्वय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असेच म्हणावे लागेल. संपूर्ण मानव जातीच्या समतेसाठी धडपडणाऱ्या समाजाला डॉ.बाबासाहेबांना काय अपेक्षित होते हे पाहिले म्हणजे त्या अपेक्षा पुऱ्या करू शकलो का? त्यासंबंधी कोणती परतफेड केली? असे प्रश्न उपस्थित होतात. हजारो वर्षापासून मानवाच्या एका मोठ्या समूहाला माणूस म्हणून जगू दिले जात नव्हते. केवळ विशिष्ट समाजात जन्माला आल्याने त्यांना तुच्छ व हीन वागणूक दिली जात होती. अशा माणसांना प्रतिष्ठा मिळावी हे त्यांचे जीवन ध्येय होते. त्यांच्या सर्व क्रांतीचा हाच केंद्रबिंदू होता. गरज नसलेल्या फालतू गोष्टीनं मया सूराच्या मयसभेत फजितीवाडा झालेल्या दुर्योधना सारखी पराकोटीची अवस्था सर्व मानवजातीची करू सोडली आहे. डॉ.बाबासाहेबांना ही अवस्था पूर्णपणे नष्ट करायची होती. जात हटवून माणूस श्रेष्ठ आहे, महान आहे अशा तत्वावर आधारित समता प्रस्थापित करण्यासाठी, दलित, पीडित, आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे होते, शिक्षण संपन्न करायचे होते. खरेतर अशी मोठी स्वप्ने बाबासाहेबांनी पाहिली होती. यासाठी आपण काय केले नाही आपण उलट काहीच न करता पुष्कळ काही करीत असल्याचा भास मात्र निर्माण केला आहे. बाबासाहेबांचे महानिर्वाण झाल्यानंतर एक गोष्ट आपण केली शेवटी त्यांना एकाच जातीत घातले. आज त्यांची जयंती सर्व समाजाकडून साजरी केली जात नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजातील माणसांना प्रतिष्ठा मिळून दिली. लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली, कामगारांचे कल्याण केले, स्त्री वर्गाची उन्नती पाहिली, स्त्री-पुरुष समानता निर्माण केली. सिंचन व नदी जोड प्रकल्प बाबतीत भरीव कामगिरी केली. असे महान कार्य करणाऱ्या महा पुरुषास आपण काहीच दिली नाही. विफल, विकृत जातीयवादांना पोखरून विखुरलेला दुर्बल देश देला हे कटू आहे ; पण सत्य व वास्तव आहे. प्रा.तुकाराम पाटील पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चिप महाराष्ट्र माझा, प्रतिनिधी
बाबासाहेबांनी इतकं काही दिलं, बदल्यात आपण त्यांना काही दिलं ?
