कोल्हापूर प्रतिनिधी-प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी. आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. मानवनिर्मित, निसर्गनिर्मित आणि जैविक आपत्ती असे आपत्तीचे तीन प्रकार आहेत. नैसर्गिक आपत्ती मध्ये भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, वादळे, पूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. मानवी आपत्तीमध्ये आग लागणे, युद्ध, अपघात, दहशतवाद, बॉम्बस्फोट, संप व टाळेबंदी इतर आपत्तींचा समावेश होतो. जैविक आपत्तीमध्ये मलेरिया, कॉलरा (पटकी), स्वाईन फ्लु, सार्स, मार्स, सारी, कोरोना यांचा समावेश होतो. मागील वर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा व महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्याने महापूर आपत्तीशी लढा दिला व या वर्षी कोरोना या जैविक महामारीचा सामना करत आहोत. आपत्ती किंवा दुर्घटना घडली कि आपत्ती व्यवस्थापन, त्या बाबत नागरिकांमध्ये असलेले अनभिज्ञता चर्चा सुरु होतात. आज भारतात युवावर्ग क्रियाशील आहे. महापुराच्या काळात मदतीसाठी युवावर्ग अग्रस्थानी होता पण आपत्ती व्यवस्थापनाचा अभावामुळे मदतीचे नियोजन योग्य प्रकारे होत नव्हते. आपत्तीच्या वेळी धावून जाणे हे संवेदनशील व उत्तम नागरिकांचे घोतक आहे परंतु आपत्तीबद्दलचे वैज्ञानिक शिक्षण नसेल तर अनर्थ होऊ शकतो. आज सुद्धा युवावर्ग गरजुंना मदतीसाठी समोर आला आहे पण साथरोग बदल वैज्ञानिक माहिती नसेल तर तो स्वतः अडचणीत येऊ शकतो. सरकार व प्रशासन कोरोनाचा अटकाव करण्यासाठी घरी राहण्याचे आवाहन करत आहे पण नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहे तसेच सोशल मिडियांचा होणारा दुरुपयोग. मास्क लावणे आवश्यक आहे पण मास्कची विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने केली जात आहे व नवीन प्रश्नांना निमंत्रण दिले जात आहेत. आपत्तीचे गांभीर्य लक्षात आले नाही कि, अशी अनेक प्रश्न निर्माण होतात. तहान लागली की विहीर खणायची अशी एक मन आहे. अनेकदा विविध प्रकारच्या आपत्ती येऊनही त्यांचा सामना कसा करायचा, हे शिकायला आपण तयार नाही. तेवढ्या पूर्ती चर्चा होते व पुन्हा पाढे पंचावन्न. भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा व त्या नंतर होणाऱ्या समस्यांचा अभ्यास व व्यवस्थापन शिक्षण हे केवळ कागदोपत्री नव्हे, तर सर्वप्रकारे उत्तमरित्या प्रशिक्षित करणारे शिक्षण देणे हे क्रमप्राप्तच आहे. किंबहुना हि काळाची गरज आहे. शिवाजी विद्यापीठात चॉइस बेस्स्ड क्रेडिट सिस्टम (सीबीसीएस) शिक्षण प्रणाली अत्यंत प्रभावीपणे राबविला जात आहे व विद्यापीठ नेहमीच समाजपयोगी अभ्यासक्रम सुरु करण्यात अग्रेसर राहिले आहे. आपत्ती व्यवस्थापनाची गरज लक्ष्यात घेऊन पदवीस्तरावर उत्तमरित्या प्रशिक्षित करणारे आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण दिले तर भविष्यात नक्कीच जागरूक पिढी तयार होईल.अशी प्रतिक्रिया डॉ. ओमप्रकाश पवार यांनी व्यक्त केली.