मिरज/ग्प्रतिनीधी– संजय पवार
भाषा संवर्धनासाठी व भाषा विकासासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांकडून मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी संघटितपणे प्रयत्न करावा असे आवाहन जेष्ठ कवयित्री सौ नीलम माणगावे यांनी स्पष्ट केले.
मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी निवडपत्र समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विष्णू वासमकर होते.
सौ. माणगावे यांनी युवकभारती, अकरावी वर्गाचे पाठ्यपुस्तकातील त्यांच्या” पैंजण” या कवितेच्या निर्मिती प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण करताना, पूर्व कालीन स्त्री जीवन व आधुनिक समाजवास्तव यांची तौलनिक मांडणी केली. आगमी प्रकाशित होणार्या काव्यसंग्रहातील विविध कवितांचे सादरीकरण केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा. डॉ. विष्णू वासमकर म्हणाले,भाषेवर समाज मालकी आहे. साहित्य आणि संस्कृती व भाषा यांचा घनिष्ठ संबंध आहे कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मराठी भाषा विषय सक्तीचा व्हावा यासाठी संघटितपणे प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.
समारंभाच्या प्रारंभी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करून प्रास्ताविकात प्रा. दिलीप जाधव यांनी जिल्हा संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांसाठीच्या समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.
समारंभाचे अध्यक्ष प्रा. डॉ. वासमकर यांचा सत्कार प्रा. दिलीप जाधव यांनी तर प्रमुख अतिथी सौ माणगावे यांचा सत्कार प्रा. सौ नीता पाटील यांनी केला. प्रा. दिलीप जाधव यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ माणगावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांचा परिचय प्रा सौ मेघा अलासे यांनी करुन दिला. प्रा. सौ. नीता पाटील ,प्रा. विजयकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सुनील गवारी, प्रा. माणिक कोडग, प्रा. विठ्ठल कुलकर्णी, प्रा धीरजकुमार पाटील, प्रा. सौ.सीमा सूर्यवंशी, प्रा. सौ. भारती बाबर, प्रा. सौ. वैशाली महाडिक -पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अनिल देशमाने यांनी स्पष्ट केले तर आभार प्रा. बाबासाहेब पाटील यांनी मानले.
