सांगली प्रतिनिधी- अशोक मासाळ

मिरज :येथून पाच किलोमीटर अंतरावरील सावळी या गावी राहणाऱ्या सुमारे एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी त्यांना दहावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकाचा जाहीर सत्कार केला. त्या भाग्यवान शिक्षकाचे नाव रवींद्र फडके असे आहे .हे विद्यार्थी पस्तीस वर्षांपूर्वी इंग्रजी, गणित शिकण्यासाठी फडके क्लासेस मध्ये जात होते. या सत्कार समारंभासाठी अमेरिकेत असणार्‍या किरण हलवाई ने आपले वेळापत्रक बदलले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य डॉ. सदाशिव भोसले होते प्रमुख पाहुणे म्हणून एस एम हायस्कूलचे मुख्याध्यापक अर्जुन सावंत उपस्थित होते. प्रा. लक्ष्मण मोरे ,सावळी चे सरपंच श्रीकांत डोंगरे, उपसरपंच गजानन गाढवे, माजी उपसरपंच संदीप बंडगर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले, पोलीस पाटील अंकुश कांबळे, रमेश चौगुले, शशिकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत किरण शिंदे यांनी केले. प्रास्ताविक पत्रकार नामदेव भोसले यांनी केले.
केशव भोसले यांच्या संकल्पनेतून फडके क्लासेस माजी विद्यार्थी समिती, सावळी ची स्थापना करून या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले या समितीमध्ये भरत गुरव.,कुमार माळी,.दीपक कारंडे,मनोज कांडकर,सुभाष शिंदे,अनिल काळे,बबन माळी ,कीरण शिंदे,केशव भोसले,कीरण हलवाई,संदीप बंडगर ,कुबेर गणे,विनोद मोरे, दादासो बंडगर, उदय हलवाई,शशिकांत जाधव,दौलत माळी,बंडु चौगुले,गजानन गाडवे,शशिकांत चौगुले,प्रदीप शिंदे यांचा समावेश आहे. ही समिती पुढील काळातही फडके सरांनी ठेवलेल्या आदर्श प्रमाणे विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
फडके क्लासेस च्या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये रोटरी क्लब सांगली चे अध्यक्ष शशिकांत चौगुले , करण भरत गुरव ,उमेश चौगुले यांनी फडके सरांच्या शिकवण्याच्या विशिष्ट कौशल्यावर विविध आठवणी सांगितल्या. विनोदी किस्से सांगितले. सावळी गावातील सुमारे ७० टक्के विद्यार्थी हे फडके क्लासेस मध्ये पहिले रक्तदान केले असे अभिमानाने सांगतात. वृक्षारोपण व्यसनमुक्ती आदी उपक्रम फडके सरांच्या प्रेरणेतूनच चालू आहेत अशी माहिती त्यांनी दिली. सावळी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लहान मुलांचा तरुणांचा मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू व रोप देऊन सत्कार करण्यात आला
ज्या पैशाला घामाचा वास नाही तो पैसा वापरायचा नाही ही शिकवण आचरणात आणल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सदाशिव भोसले यांनी सांगितले. गरीब व होतकरू मुलांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विविध मार्गांची माहिती मुख्याध्यापक अर्जुन सावंत यांनी दिली.
या माजी विद्यार्थ्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते गुरु माता मीनाक्षी रवींद्र फडके यांचा संगमरवराची सरस्वती मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन फडके सरांचा गौरव केला.
पस्तीस वर्षापूर्वीच्या खाजगी क्षेत्रातील शिक्षकाचा -क्लास चालकाचा असा जाहीर गावपातळीवरील सत्कार हा राष्ट्रपती पुरस्काराच्या बरोबरीचा आहे असे मत सत्कार मूर्ती रवींद्र फडके यांनी व्यक्त केले. सध्याच्या काळात पालकांना दिशा देण्याचे काम महत्त्वाचे आहे असे सांगून फडके सर म्हणाले की पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल मर्यादित काळासाठी दिला पाहिजे. त्यांना एखाद्या खोलीत बसून मोबाईलचा वापर करण्यास परवानगी दिली नाही पाहिजे. बैठकीच्या खोलीत मुलाने मोबाईल वरून ऑनलाईन धडे घेतले पाहिजेत. एक तासापेक्षा जास्त वेळ मेसेजेस करण्यासाठी विद्यार्थी वेळ देणार नाहीत याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. ज्याचे पालक आपल्या मुलाकडे लक्ष देतील अशीच मुले भविष्यकाळात आपले उज्वल भवितव्य घडवू शकतील अन्यथा सामान्य माणसाप्रमाणे त्यांना जीवन जगावे लागेल. आई-वडिलांनी थोडे पैसे कमी मिळवले तरी चालतील पण आपल्या मुला मुलींसाठी वेळ देणे अतिशय गरजेचे आहे असे प्रतिपादन फडके सर यांनी केले.

या कार्यक्रमाचे संकल्पक केशव भोसले यांनी अशा गावाचे वैभव वाढवणाऱ्या कार्यक्रमातुन आजच्या तरूणांनी आपली जबाबदारीओळखुन कसे वागले पाहीजे ते ठरवायला हवे व आपल्या आईवडीलांनी मिळवलेल्या वैभवात,मानसन्मानात भर घातली पाहीजे व त्याच्या ह्या वैभवाकडे पाहून ते आनखीन कसे वाढेल या गोष्टीची लहान मुलांनी व तरुणांनी काळजी घेतली पाहीजे म्हणजे ज्या झाडाखाली लोकांनी फुले वेचली त्या झाडाखाली गोवऱ्या वेचल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे आव्हान ही त्यांनी केले.
दीपक कांरडे यांनी मागील अनेक गोष्टींना उजाऴा मिळाला व बरेच दिवस करायचा होता तो सत्कार समारंभ सर्वांच्या सहकार्यातुन सपंन्न झाला असे सांगून सर्वांचे आभार मानले.फडके सर स्वतः वाघासारखे जगले व आपल्या विद्यार्थ्यांना वाघासारख जगण्यासाठी प्रेरणा दिली अशा भावना सूत्रसंचालक किरण बंडगर यांनी व्यक्त केल्या.