कोल्हापूर प्रतिनिधी :- प्रा.सुरेश डोणे
सुळकूड(ता.कागल)येथील ग्रामदैवत श्री.मसोबा देवाची यात्रा प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात भरते.या यात्रेनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. त्याच बरोबर यात्रा कालावधीत सुळकूड तसेच बाहेर गावाहून अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. दंडवताची परंपरा तर फार वर्षांपासून चालत आलेली आहे. यात्रेत खेळणी दुकाणे, पाळणे,आईस्क्रीम गाडे यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.पण यावर्षी यात्रेवरती कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येते.
कोरोना रोगाने सध्या देशातच नव्हे तर जगात थैमान घातले आहे.खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री.दौलत देसाई यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. दरम्यानच्या काळात सन, उत्सव, यात्रा,जयंती यासारखे सार्वजनिक व राजकीय कार्यक्रम होणार नाहीत याबाबत आदेश देण्यात आले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे दि.३०एप्रिल ते २ मे रोजी होणारी श्री मसोबा देवालयाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार दंडवत व नैवद्य यासाठी मंदिराकडे येणेचे नाही. त्याचबरोबर कोणीही नातेवाईक, पाहुणे बोलविणेचे नाही . या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आलेस कायदेशीर कारवाई केली जाईल असे कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती व श्री.मसोबा यात्रा कमिटी सुळकूड यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
