संजय पाटील,कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी.

मा. शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी माध्यमिक शाळांकडील अर्धवेळ शिक्षकांचा जानेवारी २०२० पासून बंद केलेला पगार सुरु करुन कोरोना आपत्तीमध्ये अडचणीत आलेल्या शिक्षकांचे वेतन सुरु करण्याचे आदेश पाचही जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व संबंधित वेतन पथक यांना द्यावेत अशी जोरदार मागणी होत होती.शिक्षकांनी केलेल्या मागणीला आता यश आले आहे.

कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शै. वर्ष २०१९-२० मध्ये कार्यरत तासिका तत्त्वावरील शिक्षकांना गेले वर्षभर वेतन नसल्याने त्यांची खूप ससेहोलपट होत होती..हे सर्व शिक्षक आता कोरोना प्रतिबंधक लाॅकडाऊन काळात अडचणीत आले होते. यासंदर्भात शिक्षक भारती तर्फे प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी मा. शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांना पत्रे पाठवून दिली होती.. वारंवार लेखी व फोनवरुन पाठपुरावा केला होता.. आज सकाळी १०.००वा.मा.शिक्षण उपसंचालक श्री. सोनावणे यांना फोन करुन वेतन अदा करणेचा आदेश काढा अशी विनंती त्यांनी केली, व तात्काळ तसा आदेश दि. ०९.०४.२०२० च्या पत्राने काढला आहे. मा. सोनावणे साहेब यांचे सर्व तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे व शिक्षक भारती तर्फे प्रा. बिरनाळे यांनी आभार मानले आहेत.
कोल्हापूर विभागातील संबंधित सर्व मुख्याध्यापक /प्राचार्य यांनी आपल्याकडील उच्च माध्यमिक /कनिष्ठ महाविद्यालयीन तासिका तत्त्वावरील शिक्षकांची वेतन बिले तयार करुन कार्यभार हमीपत्रासह आपापल्या जिल्ह्यातील वेतन पथकाकडे पे युनिटच्या सूचनेनुसार तातडीने सादर करावीत. हे करताना मा. शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या दि. ९.४.२०२० च्या पत्रात नमूद केले प्रमाणे कार्यवाही करावी असेही प्रा. नेमिनाथ धनपाल बिरनाळे
उपाध्यक्ष शिक्षक भारती महाराष्ट्र यांनी कळविले आहे. तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या वेतनाचा या वर्षाचा प्रश्न सुटल्यावर आता मा. शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी माध्यमिक शाळांकडे जे शिक्षक २०१३ पूर्वी पायाभूत अर्धवेळ पदावर काम करीत होते व २०१३ मध्ये पूर्णवेळ झाले त्यांना डिसेंबर 2019 अखेर वेतन मिळाले आहे. जानेवारी २०२० पासून त्यांचा शालार्थ आयडी नाही या कारणाखाली पगार बंद केला आहे. अशा शिक्षकांना शालार्थ आयडी तातडीने द्यावेत व तोपर्यंत त्यांचा अर्धवेळ पायाभूत पदावरील पगार जो जानेवारी 2020 पासून बंद केला आहे, तो ऑफलाइन पगार बिले घेऊन त्यांना अदा करणेबाबत पाचही जिल्ह्यातील संबंधित सर्व शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षक यांना आदेश द्यावा;अशीही जोरदार मागणी शिक्षक भारती तर्फे प्रा. बिरनाळे यांनी केल्याचे कळविले आहे.