,

संजय पाटील,कोल्हापूर.

आज महान समाजसुधारक महात्मा फुले यांची जयंती मोठ्या श्रद्धेने आपण साजरी करतोय. त्यांनी या देशात दोन भूमिका बेमालूमपणे वटविल्या..एक समाजसुधारक आणि दुसरी समाजशिक्षकाची.. नाहीरे वर्गाला नियोजनबद्धरित्या कायम दरिद्री ठेवण्याचा रचलेला कट त्यांनी बंडखोरीने उधळून लावला.. जुन्या समाजविघातक रुढी परंपरेतून बहुजन समाजाला बाहेर काढण्याची अवघड कामगिरी केली..या कामी त्यांना क्रांतीमाता सावित्रीमाई, पाहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख व उस्मान शेख यांची साथ महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. जातीभेदामुळे भारतीय समाजात दारिद्र्य निर्माण झाले आहे आणि ते शिक्षणानेच नाहीसे करता येते म्हणून सक्तीच्या सार्वत्रिक व मोफत शिक्षणाचा प्रयोग यशस्वी करुन दाखविला.. स्त्री शिक्षण हा दारिद्र्य निर्मूलनाचा पाया आहे हे लक्षात घेऊन त्यांनी पुण्यात मुलींची शाळा सुरू केली.. जातीभेदात होरपळून गेलेल्या वंचितासाठी शाळा सुरू केली.. समाजसुधारणा ही शिक्षण आणि क्रांतिकारक लेखणीतून होते यावर त्यांचा दृढविश्वास होता यासाठी त्यांनी शाळा काढल्या आणि विपुल लेखनही केले. त्यांनी लेखनातून नाहीरे वर्गात भावनिक, नैतिक आणि वैचारिक जागृती निर्माण केली.. याचा परिणाम असा झाला की, नाहीरे वर्गाला आपल्या हक्कांची जाणीव झाली व हा समाज असत्याविरुध्द बंड करुन सर्वांचा एकच धर्म म्हणजे सत्यधर्माचा पाईक झाला. त्यांचे इंग्रजी साहित्य वाचन प्रचंड होते.. जगातील अनेक पुरोगामी व लोकशाही मूल्यावर प्रगाढ निष्ठा असलेल्या इंग्रजी साहित्यकारांचा प्रभाव त्यांच्या लेखन व विचारात दिसून येतो. छ. शिवाजी महाराजांच्या कार्याने प्रभावीत होऊन विषमतेवर प्रहार करताना दिसतात. १८८९ मध्ये ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा म. फुल्यांनी लिहीलेला जो ग्रंथ प्रसिद्ध झाला त्यामध्ये” माणसाचे खरे सुख, देव, पाप पुण्य, जातिभेद, धर्म, नीती, सत्य, जन्म, मृत्यू आणि माणसाच्या श्रद्धा या विषयावर त्यांनी खूप छान विवेचन केले आहे… या ग्रंथात ते म्हणतात, ‘आपण सर्व जन्मतःच स्वतंत्र आहोत, सर्वांना राजकीय व धार्मिक स्वातंत्र्य आहे, सर्वानी बंधुत्वाने वागले पाहिजे, इतर कोणत्याही प्राणिमात्रांना त्रास देऊ नये, सर्वांना उचित बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, राजकिय अथवा धार्मिक मतावरून एकमेकांना कमी लेखून छळ करु नये, प्रत्येकाला योग्यतेनुसार सर्वत्र संधी मिळाली पाहिजे.. कोणीही कोणतेही व्यसन करता कामा नये, चोरी करू नये, शेतकरी व कष्टकऱ्यांना श्रेष्ठ समजावे. धर्माच्या नावाने इतरांना लुबाडू नये.. असे अनेक चांगले विचार महात्मा फुले यांनी सांगितले आहे. याच विचारांचा प्रभाव संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनावर होता.. म्हणून हेच विचार भारतीय संविधानातील प्रत्येक तरतूदीमध्ये आपल्याला दिसून येतात.. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म.जोतिबा फुले यांना भ.बुध्द आणि संत कबिरांबरोबर गुरु मानले आहे. या ग्रंथात ‘ज्ञानेश्वरीत’ जसे पसायदान आहे तशी प्रार्थना आहे.. पृथ्वी, पाणी आणि हवा सर्वांसाठी एक आहे मग सर्वांसाठी एकच धर्म का असू नये.. ही म.जोतिबा फुले यांची प्रार्थना आज देशातील सर्व जनतेच्या अंतकरणात रुजावी ही सद्भावना हे खरे म.जोतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीचे अभिवादन ठरेल.
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य तर्फे म.जोतिबा फुले यांना विनम्र अभिवादन .
प्रा. नेमिनाथ धनपाल बिरनाळे
उपाध्यक्ष,
शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य.
८८८८४७५५५२