लोहारा (प्रतिनिधी):-लोहारा व परिसरात ६नोव्हेंबर च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन ठिकाणी यशस्वी चोरी केली तर लोहाऱ्यात चोरीचा अयशस्वी प्रयत्न शेजारील नागरिकांच्या सतर्कतेने फसल्याने पोलीसांनी रात्रीची गस्त घालावी,अशी मागणी होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,६ नोव्हेंबर च्या रात्री जवळपास २:३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संत जगनाडे महाराज चौकातील पालीवाल किराणा दुकान फोडण्यासाठी कुलूप तोडले व अर्धे शटर उघडले मात्र त्याचवेळी शेजारी राहणारे नागरिक आवाजाने अचानक जागी झाल्याने त्यांनी आरडाओरडा केली असता चोर मोटार सायकल वरून पळून जाण्यात यशस्वी झाले. व या चोरांच्या हालचाली शेजारच्या दिनेश प्रोव्हिजन यांनी बसविलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेल्या आहेत .त्यावरून माहिती घेतली असता मोटारसायकल ही कुरंगी ता पाचोरा येथून चोरी करून मग चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजते.याबाबत पालीवाल किराणाचे मालक राधेश्याम पालीवाल यांनी लोहारा पोलीसात तक्रार दिली आहे. तसेच चोरट्यांनी कुऱ्हाड तांडा येथील एकनाथ गणेश बंजारा यांचे किराणा दुकान फोडून अंदाजे रोख व चिल्लर मिळून २००० रुपये चोरट्यांनी लंपास केले तर कळमसरा येथील गावालगत असलेल्या शाळेजवळील जयवंत पंडितराव वाघ यांच्या शेतात बांधलेल्या जवळपास १लाख २५हजार रुपये किमतीच्या २म्हशी चोरट्यांनी चोरून नेल्या.
या तीन ठिकाणी चोरी ची घटना घडल्याने चोरांनी आपला मोर्चा लोहारा परिसराकडे वळविला असल्याचे दिसून येते. याबाबत पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलून या चोरांचा शोध घ्यावा व रात्रीच्या वेळी गस्त घालावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

दिपक पवार,लोहार