देऊळगांव राजा(ता.प्रतिनिधी):-
तालुक्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.पिकांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५०००/- रुपये मदत देण्यात यावी. अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसीलदार यांच्या मार्फत राज्याच्या मुख्य सचिवांकडे आज निवेदनाद्वारे केली केली आहे.
निवेदनात नमूद आहे की,यंदा राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने हता-तोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सोयाबीन,कपाशी,मका यासह अन्य पिके चांगली आली होती.मात्र ऐन शेतमाल काढणीच्या वेळी परतीचा पाऊस सतत बरसल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.पाऊसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत.कापसीवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी अद्यापही पंचनाम्याच्या कामाला सुरवातही झालेली नाही.तात्काळ पंचनामे करून देऊळगांवराजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे.पिकांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५०००/- रुपये मदत घ्यावी अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.निवेदनावर तालुका संघटक जहीर खान,ज्ञानेश्वर शिंदे,अयाज पठाण,विनायक अनपट, समाधान पाबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

आदील पठाण ,देऊळगांव राजा